ज्येष्ठ श्रीगुरुदेव भजन गायक मधुकर बोबडे समर्पित जीवन पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गेल्या ४० वर्षांपासून भजनांच्या माध्यमातून संतांचा मानवतावादी विचारांचा प्रचार प्रसार करणारे ज्येष्ठ भजन गायक मधुकर बोबडे यांना समर्पित जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने दाताळा येथील म्हाडा कॉलनीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी श्री . बोबडे यांना अमृत महोत्सवी कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नकोडा घुग्घुस चे सरपंच किरण बांदूरकर, ज्येष्ठ श्रीगुरुदेव प्रचारक बापूजी बोबडे (बाबुपेठ), बाळकृष्ण झाडे (नकोडा), जगन्नाथ महाराज वारकरी भजन मंडळाचे बळीराम बेलेकर , धम्ममित्र नामदेव गेडकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी संत साहित्य , भजन प्रभाव संबंधाने समयोचित भाष्य करून भजन गायक मधुकर बोबडे यांच्या निष्काम प्रचार सेवा कार्याचे कौतुक केले. आषाढी एकादशीच्या वारी निमित्ताने रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान, जो सत्याविना न बोले, गुरुकृपेला ज्ञान हवे, विटेवरी उभा देव असा आदी अजरामर भक्ती गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भजन गायक म्हणून उद्धव वडस्कर, देवराव कन्नाके , नत्थुजी उरकुंडे, प्रभाकर मरसकोल्हे, देवराव वझे, गोविंदराव जोगी , राकेश बोबडे, राजु बोबडे, महादेव वाघमारे, संतोष बोबडे, हनुमान बोबडे, श्री. खनके, श्री. सुर, श्री. बावणे, आदींनी उत्तम सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. मंदा बोबडे , रितेश बोबडे आदींनी परिश्रम घेतले.



