धोकादायक आणि जीर्ण इमारतीतून अध्यापनाचे धडे
नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासंदर्भात गावकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्राच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळेतील ४ वर्ग खोल्या आणि गावातील अंगणवाड्यापैकी तीन केंद्रांच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत आहेत. यामुळे या ठिकाणी सुसज्ज आणि नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, या संदर्भातील निवेदन गावातील पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी संजय नैताम यांच्या मार्फतीने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे मोठ्या गावापैकी एक गाव. गावची लोकसंख्या पाच हजाराच्या आसपास आहे. अशातच शाळकरी विद्यार्थी आणि अंगणवाडी केंद्रातील बालकांची संख्या मोठी आहे. मात्र गावात वर्गखोली आणि अंगणवाडी केंद्राच्या इमारती धोकादायक आहेत. इमारतीला भेगा गेल्या आहेत. वर्ग खोल्यात पाणी गळते आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जि.प.विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम करण्याचे निवेदन गावातील शिष्टमंडळाने दिले आहे. या शिष्टमंडळात माजी उपसरपंच सारनाथ बक्षी, प्रशासकीय समितीचे सदस्य समीर निमगडे, निखिल बामणे, सामाजिक कार्यकर्ते राकेश चापले, वैभव निमगडे आणि बादल देऊरमल्ले यांचा समावेश होता.
सद्या शाळेत १७० विद्यार्थी आहेत. पटसंख्या लक्षात घेता एक वर्गखोलीचे बांधकाम अत्यंत आवश्यक आहे. वर्गखोल्या जीर्ण असल्याच्या बाबतीतला पाठपुरावा शिक्षण विभागाला केला आहे.
*रवींद्र मोहूर्ले, मुख्याध्यापक* *जि.प.शाळा,करंजी.*
जि.प.शाळा वर्गखोली आणि अंगणवाडी केंद्राच्या जीर्ण इमारतीबाबत यापूर्वी अनेकदा पाठपुरावा केला आहे. दोन्ही विभागाच्या इमारती धोकादायक असल्यामुळे तातडीने मंजूर करून बांधकाम करण्यात यावे.
*समीर निमगडे,सदस्य* *प्रशासकीय समिती,ग्रा.पं.करंजी*
करंजीतील ३ अंगणवाडी केंद्राच्या इमारती जीर्ण आहेत. यापूर्वी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. नव्याने प्रस्ताव मागितला आहे.
*अश्विनी मेश्राम,पर्यवेक्षिका, महिला व बालकल्याण, पं. स. गोंडपिपरी*



