ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सीमेवरील शेतकऱ्यांवर अन्याय; तेलंगणा वनविभागाने उभ्या पिकांवर चालविला ट्रॅक्टर

सांगनापूरच्या शेतकऱ्यांची सुभाष धोटे व अरुण धोटे यांच्याकडे धाव ; न्यायासाठी आशिफाबाद येथे उद्या महत्त्वाची बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील संगनापूर येथील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तेलंगणा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील उभी पिके ट्रॅक्टरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच घाला घातल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पीडित शेतकऱ्यांनी न्यायासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतर त्यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सीमाभागातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

       या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्या तेलंगणातील आशिफाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

           यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांबळे, माधव डोईफोडे, सिताराम मडावी, तिरुपती पोले, गणेश शेटकर, गजानन वाघमारे, रामेश्वर पोले, अकबर शेख यांच्यासह गावातील नागरिक हरिचंद्र तुकाराम कुंडगिर, अकबर अब्बासअली शेख, संदीप जाधव, खंडू भिमराव शेळके तसेच शेतकरी बालाजी शिवाजी पांढरे, विष्णू नरोटे, मारोती राम शेकडे, मुरलीधर कृष्णाजी पुल्लेवाड, राहुल पांढरे आणि अन्य स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये