विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरी, येथे विशेष शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा (भद्रावती) येथील कम्युनिटी हॉल (डिफेन्स क्षेत्र) येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी तहसील कार्यालय भद्रावतीचे वतीने विशेष मतदार नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वरोरा श्री. संदीप भस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये एकूण ४७० अर्जांचे डिजिटायझेशन करण्यात आले. तसेच मतदारांना मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती व इतर निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि आवश्यक नोंदणी अर्जही भरून घेण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार (निवडणूक), भद्रावती श्री. आकाश भाकरे, नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी सौ. विशाखा शेलकी, ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा येथील अधिकारी व कर्मचारी, विजय जांभुळकर उपमुख्याधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक, तहसील कार्यालयाची टीम तसेच नगर परिषद भद्रावतीची टीम यांनी समन्वयाने कार्य करून शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.
सदर विशेष शिबिरास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, विशेष पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त केले.



