ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेताजी सुभाषचंद्र बोस हे जाज्वल्य देशभक्तीचे मूर्तिमंत प्रतीक – राजेंद्र मर्दाने

वरोरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी 

आशिष रैच, राजुरा

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ध्यास घेणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर धैर्य, शौर्य, त्याग आणि जाज्वल्य देशभक्तीचे मूर्तिमंत प्रतीक होते, असे प्रतिपादन जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी येथे केले.

जय हिंद सैनिक संस्था, चंद्रपूर जिल्हा शाखा व विवेकानंद उच्च माध्यमिक व प्राथमिक विद्यालय,वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने सलीमनगरच्या विवेकानंद शाळा परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

     व्यासपीठावर प्रख्यात चित्रकार प्रल्हाद ठक, वरोरा नगर परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती योगिता भारत नेरकर, बांधकाम सभापती मनीष जेठानी, नियोजन व विकास सभापती राहुल देवडे, मुख्याध्यापिका मंगला ठेंगणे, नवनिर्वाचित नगरसेवक बंडू देऊळकर, राजकुमार खंडारे, प्रवीण चिमूरकर, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष चेतन लुतडे, पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका अध्यक्ष शाहीद अख्तर, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी दिनेश ठाकरे, माजी प्राचार्य बी.आर. शेलवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

      मर्दाने यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या साहसिक, संघर्षशील आणि प्रेरणादायी जीवनकार्याचा नेटक्या शब्दांत आढावा घेत विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, जिद्द, शिस्त, अभ्यासात सातत्य, वेळेचे पालन व देशप्रेम हे विशेष गुण अंगीकारण्याचे आवाहन केले.

          योगिता नेरकर यांनी नेताजींच्या “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा”, या ऐतिहासिक आवाहनाचा हवाला देत,आझाद हिंद सेनेने इंग्रज सत्तेला कसा हादरा दिला,हे सोदाहरण स्पष्ट करीत त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रशंसोद्गार काढले.

      चित्रकार ठक म्हणाले की, नागरिकांमध्ये आणि विशेषतः नवयुवकांमध्ये राष्ट्रभक्तीचा अभाव जाणवल्याने त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागविण्यासाठी मी स्वरक्ताने क्रांतिकारकांची चित्रे रेखाटण्याचे आणि भारतभर त्याची प्रदर्शने भरविण्याचे व्रत घेतले. देशभक्तीचा जागर निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी मांडले.

यावेळी मुख्याध्यापिका मंगला ठेंगणे व नगरसेवक बंडू देऊळकर यांनी मनोगत व्यक्त केले तर रचिकेत दुमोरे, चित्राणी येसे, परी चोधरी, चैताली जाधव यांनी नेताजींच्या जीवनावर प्रभावी भाषणे केली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना जय हिंद सैनिक संस्थेच्या वतीने मान्यवरांचे हस्ते प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, बाळासाहेब ठाकरे, माँ शारदा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. मंजूषा वरुडकर यांनी सुमधुर आवाजात शारदा स्तवन सादर केले. यानिमित्ताने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन तर वरोरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, सभापती यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमस्थळी चित्रकार प्रल्हाद ठक यांनी स्वरक्ताने चितारलेली व प्रदर्शनात ठेवलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह क्रांतिकारक व समाजसेवकांची चित्रे विशेष आकर्षण ठरली.

       सदर कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू व जय हिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक चंद्रमोहन बोस, राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने आणि राष्ट्रीय सचिव जनार्दन जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. आभार शिक्षिका मंजूषा वरुडकर यांनी मानले.

     कार्यक्रमाला जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सागर कोहळे, पदाधिकारी विजय वैद्य, अशोक बावणे, प्रकाश पोहाणे, सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन टिपले, एन. आर. उरकांडे, जी.एम. वानखेडे आदींसह सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद विद्यार्थी – विद्यार्थीनी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते अमन टेमुर्डे, सतीश सारडा, संजय गांधी, बळवंतराव शेलवटकर, अक्षय हनुवते, दिव्या नंदनवार, तुषार मर्दाने, हितेंद्र तेलंग आदिंनी परिश्रम घेतले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये