महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे – नगराध्यक्षा अलका अनिल वाढई
महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या प्रेरणादायी हळदीकुंकू कार्यक्रमातून आवाहन

चांदा ब्लास्ट
काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते भास्कर कावळे व सोनाली भास्कर कावळे यांचा पुढाकार
चंद्रपूर :_ बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने कोर्टीमत्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात कोर्टीमत्ता, कोर्टीतुकूम तसेच कोर्टी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. अलका अनिल वाढई उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा तसेच महिला व बालकल्याण सभापती मेघा भाले, तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद उपरे, महिला काँग्रेस अध्यक्षा अफसाना सय्यद मॅडम, काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते भास्कर कावळे, सौ. सोनाली भास्कर कावळे, सामाजिक कार्यकर्ते राजू मेश्राम, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे तसेच तालुका काँग्रेस उपाध्यक्षा नाजुका हनुमान आलाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन हळदीकुंकूचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला. महिलांमध्ये सामाजिक एकोपा वाढविणे, सन्मानाची भावना निर्माण करणे तसेच सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. अलका अनिल वाढई यांनी महिलांनी आत्मविश्वासाने सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपस्थित अन्य मान्यवरांनीही महिलांच्या सशक्तीकरणावर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली भास्कर कावळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तालुका काँग्रेस उपाध्यक्षा नाजुका हनुमान आलाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन भास्कर कावळे यांनी केले.
महिलांच्या सशक्तीकरणाचा ठोस संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, महिलांना सामाजिक सहभाग, आत्मसन्मान आणि संघटनशक्तीची जाणीव करून देणारा ठरला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, काँग्रेस कमिटीच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात विशेष स्वागत करण्यात येत आहे.



