मन आणि शरीर यांचे एकत्रित साधन म्हणजे योग – महेश जोशी
रथसप्तमी निमित्त वरोऱ्यात भव्य सूर्यनमस्कार यज्ञ

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
राजेंद्र मर्दाने, वरोरा
७०० विद्यार्थ्यांनी ७५ आकृतीत सादर केले सामूहिक सूर्यनमस्कार
वरोरा : मन आणि शरीर यांचा समतोल साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे योग असून, शरीर बळकट करायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, यवतमाळचे अध्यक्ष महेश जोशी यांनी केले. लोकशिक्षण संस्थेच्या परिसरात रथसप्तमी निमित्त आयोजित सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील हे होते.
महेश जोशी पुढे म्हणाले की, कोविडनंतर आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, योग व प्राणायाम अत्यावश्यक झाले आहेत. योगामुळे कार्यक्षमता वाढते, मन स्थिर राहते व निराशेवर मात करता येते. तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे, कारण त्यामुळे शरीर, बुद्धी व मन सुदृढ राहते आणि निरोगी जीवनशैली निर्माण होते.
प्रा. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून, सूर्यनमस्कार यज्ञ उपक्रमाला यंदा बारा वर्षे पूर्ण झालेत. विद्यार्थ्यांनी नियमित सूर्योदयापूर्वी उठावे तसेच शाळेची सुरुवात सूर्यनमस्काराने केल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ते निरोगी राहतील, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शिशु मंदिर ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी व्यंकटेश स्तोत्र, सूर्य स्तुती, शिव तांडव व पर्यावरण स्तोत्र सादर करून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले. विशेष आकर्षण ठरले ते सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी ७५ आकड्याच्या आकारात समंत्र सामूहिक सूर्यनमस्काराचे सादरीकरण. तसेच संस्थेच्या ३० शिक्षकांनी खुर्चीवरील आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. सूर्यनमस्कार व स्तोत्रपठण कार्यक्रमात एकूण ११०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा कोरासे कौरासे तर सूत्रसंचालन जिया गुगल व अनुपमा वाणे यांनी केले. आभार प्रदर्शन मनस्वी लोहकरे यांनी मानले.
कार्यक्रमाला योगप्रेमी, पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.



