ताज्या घडामोडी

वस्तु विकत घेतांना तपासुन घेता का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्र बिंदू आहे. म्हणून ग्राहकाला कोणी देव मानतो तर कोणी राजा. तरी देखील ग्राहका राजाची फसवणूक होते. याचे कारण ग्राहकांना त्यांच्या हक्क, अधिकाराची जाणीव नाही. ग्राहकांना आपल्या हक्काची, अधिकाराची आणि ग्राहक कायद्याची माहीती असने आवश्यक आहे.

ग्राहकाने काय करावे?

प्रत्येक गॅस सिलेंडर वर रिकाम्या सिलेंडरचे वजन (Tare Weight) तसेच निव्वळ वजन (Net Weight) दिले असते. रिकाम्या सिलेंडरचे वजन हे १४.२ किलो आणि भरलेल्या सिलेंडरचे वजन ३०.१ किलो असले पाहिजे. सिलेंडर घेतांना ते वजन करून घ्यावे. गॅसचे वजन करून घेणे हा ग्राहकाचा अधिकार आहे आणि प्रत्येक गॅस वितरकाला डेलीव्हरीबॉय सोबत वजन काटा ठेवणे बंधनकारक आहे.

मिठाई दुकानातून मिठाई खरेदी करतांना, बॉक्स विरहित निव्वळ मिठाई चे वजन मिळेल याची खात्री करावी. बॉक्स मिठाई च्या वजनात घेऊ नये.

इंधन खरेदी करतांना प्रत्येक ग्राहकाने पंपावरील मिटर शुन्यावर असल्याची खात्री करून मगच इंधन गाडीत भरावे. जर पेट्रोल, डिझेल मापात शंका वाटत असल्यास वितरका कडील पाच लिटरच्या प्रमाणित मापाने सदर पंपामधून होणारे वितरण तपासावे. हा ग्राहकाचा अधिकार असून प्रमाणित माप ठेवणे हे वैधमापन शास्त्र कायद्यानुसार प्रत्येक पंप वितरकाला बंधनकारक आहे.

पाउंड, शेर, फूट अशा अप्रमाणित मापाव्दारे वस्तु विकत घेऊ नये. कुठल्याही काट्याची अचूकता तपासण्यासाठी नियमानुसार काट्याच्या क्षमतेच्या दहा टक्के एवढी प्रमाणित वजने ठेवणे दुकानदाराला बंधनकारक आहे. काट्याच्या अचूकतेबद्दल शंका असल्यास दुकानदारा कडील प्रमाणित वजन काटा तपासावा हा ग्राहकाचा अधिकार आहे.

दुध खरेदी करतांना दुधाचे माप बाहेरून किंवा आतून ठोकलेले नसेल याची खात्री करून घ्या.

वजनाव्दारे वस्तु विकत घेत असताना प्रत्येक वेळी काट्याचा दर्शक शून्य असल्याची खात्री करूनच वस्तु घ्यावी. शंका वाटल्यास वजन काटा प्रमाणात तपासावे हा ग्राहकाचा अधिकार आहे.

प्रत्येक आवेष्टित वस्तु (Package Product) छापील किमतीलाच विकत घ्या. छापील किमतीपेक्षा जास्त दराने एखादा दुकानदार वस्तू विकत असेल तर हा वैधमापन शास्त्र कायद्यानुसार गुन्हा आहे. अश्या दुकानदाराची तक्रार वैधमापन शास्त्र विभागाकडे करावी.

प्रत्येक आवेष्टित वस्तूवर माहीती असणे बंधनकारक :

उत्पादकाचे नाव व पुर्ण पत्ता,

आवेष्टित वस्तूचे नाव,

सर्व करांसहीत असलेली किरकोळ किंमत,

निव्वळ वजन/माप/संख्या

उत्पादन महिना व वर्ष तसेच कालबाह्य (Expiry Date) कालावधी,

ग्राहक तक्रारीसाठी संपर्क क्रमांक (Contact Number) आणि ईमेल आयडी

कुठलीही वस्तु विकत घेतांना वरिल सर्व बाबी असल्याची खात्री करा. तसेच किमतीमध्ये, तारखीमध्ये खाडाखोड अथवा बदल नसल्याची खात्री करा. ऑनलाईन वस्तु विकत घेते वेळी सुद्धा वरिल घोषणा असल्याची खात्री करून मगच वस्तु विकत घ्या.

ग्राहक राजाने आता ग्राहक अधिकार, ग्राहक शिक्षण घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेचा केंद्र बिंदू असणाऱ्या ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी स्वतः जागृत राहीले पाहीजे. वस्तु विकत घेतांना किमत, माप, संख्या, वजन, गुणवत्ता यात शंका वाटत असल्यास ग्राहक अधिकाराचा उपयोग करून अशा विक्रेत्याची तक्रार करा.

प्रवीण रामचंद्र चिमूरकर,सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये