ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा चंद्रपुरात झंझावात

काँग्रेसच्या प्रचाराने घेतली आघाडी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रचाराचा धडाका लावत काँग्रेसला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असताना, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संपूर्ण शहरात एकसंध प्रचार यंत्रणा राबवून राजकीय वातावरण आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या निवडणुकीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेत प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या सभांसोबतच त्यांनी मोटार सायकल रॅली आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे. विशेषतः त्यांनी या निवडणुकीत उच्चशिक्षित आणि तरुण उमेदवारांना दिलेली संधी मतदारांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत असून, ठिकठिकाणी त्यांच्या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शहराच्या विकासासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडलेला ‘वचननामा’ मतदारांना आश्वस्त करणारा ठरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार,आमदार सुधाकर अडबले, माजी आमदार सुभाष धोटे, शहराध्यक्ष संतोष लहामगे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना एकत्रित आणून त्यांनी एक मजबूत फळी उभी केली आहे. भाजपच्या धनशक्तीला आपल्या संघटन कौशल्याने आणि प्रभावी नियोजनाने त्यांनी तगडे आव्हान दिले असून, मतदारांशी थेट संवाद साधून त्या काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा करत आहेत.

प्रचाराच्या या झंझावातामुळे सध्या चंद्रपुरात काँग्रेसला अनुकूल अशी लाट निर्माण झाली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत जनमानसात विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्या या प्रभावी नियोजनबद्ध प्रचारामुळे महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून विरोधकांच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये