ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुरसा गावात युवकांचा आदर्श पुढाकार – ‘एक दिवस गावासाठी’ उपक्रमाने गाव स्वच्छतेकडे वाटचाल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा
भद्रावती तालुक्यातील मुरसा गावात युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. ‘एक दिवस गावासाठी’ या संकल्पनेतून दर आठवड्याच्या रविवारी गावातील युवक एकत्र येत गावाच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करतात.
ग्राम पंचायत मुरसा, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथील तरुणांनी स्वच्छ आणि सुंदर गाव घडविण्याचा संकल्प केला आहे. रस्ते, सार्वजनिक परिसर, मंदिर परिसर तसेच नाल्यांची नियमित साफसफाई केली जाते. या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून ग्रामस्थही आता सक्रिय सहभाग घेत आहेत.
युवकांच्या या स्तुत्य कार्यामुळे मुरसा गाव स्वच्छतेच्या दिशेने नवी ओळख निर्माण करत आहे. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.



