ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदान करण्यासाठी आपले नाव व मतदान केंद्राचा शोध कसा घ्यावा?

मताधिकार मोबाइल ॲप, मतदार चिठ्ठी व राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट

चांदा ब्लास्ट

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान करायचे आहे. मतदान प्रक्रियेस सुलभता मिळावी, यासाठी प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही व आपले मतदान केंद्र कोणते आहे, याची माहिती आधीच करून घेणे आवश्यक आहे. यासाठी मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.

   पहिला पर्याय म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने विकसित करण्यात आलेले ‘मताधिकार’ मोबाइल ॲप. निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर, अचूक व अद्ययावत माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले असून डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मतदारांना घरबसल्या माहिती मिळणे शक्य झाले आहे.

   प्ले-स्टोअरवरून ‘मताधिकार’ मोबाइल ॲप डाउनलोड केल्यानंतर मतदारांना मतदार नोंदणीशी संबंधित सर्व माहिती सोप्या पद्धतीने मिळू शकते. ॲपमध्ये संबंधित पालिका, जिल्हा, विधानसभा अथवा प्रभाग यासारखे मूलभूत तपशील भरल्यानंतर मतदाराचे मतदान केंद्र, एपिक क्रमांक, मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता तसेच मतदानाचा दिनांक व वेळ याबाबतची माहिती उपलब्ध होते. ज्यांना आपला एपिक क्रमांक किंवा मतदान केंद्र माहीत नाही, अशा मतदारांसाठी हे ॲप विशेष उपयुक्त ठरत आहे.

   दुसरा पर्याय म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट. आयोगाच्या वेबसाईटवरील ‘मतदार’ या पर्यायामध्ये जाऊन ‘मतदार यादीत नाव शोधा’ या पर्यायावर क्लिक केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था मतदार यादी उपलब्ध होते. त्यावर क्लिक केल्यानंतर mahasecvoterlist.in हे पान उघडते व येथे मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच थेट mahasecvoterlist.in हे टाईप करूनही मतदार या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

   तिसरा व शेवटचा पर्याय म्हणजे बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) मार्फत वितरित होणारी मतदार चिठ्ठी. या चिठ्ठीवर मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्राचे नाव व तपशील नमूद असतात.

   या सर्व पर्यायांद्वारे मतदारांना आपले नाव व मतदान केंद्राची माहिती सहज मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले मतदान केंद्र आधीच जाणून घ्यावे व १५ जानेवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये