चंद्रपूरमध्ये विकासाचा विश्वास दृढ; १६ हजार नागरिकांना घरपट्टे वाटपाची प्रक्रिया गतीने सुरु – ना. चंद्रशेखर बावनकुळे
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चार जाहीर सभा संपन्न

चांदा ब्लास्ट
आजची सभा केवळ निवडणुकीसाठी नाही, तर चंद्रपूरच्या भविष्याची दिशा ठरविणारी सभा आहे. शब्द नाही, काम हे आमचे ब्रीद आहे. १६ हजार नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आहे. ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक कुटुंबांना घरपट्टे मिळाले असून आता त्यांच्या घरांचे स्वामित्व अधिकृतपणे त्यांच्या नावावर येणार आहे. हे घरपट्टे म्हणजे फक्त कागद नाहीत, तर तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याची हमी असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महानगरपालिकेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज तुकुम येथील चवरे ले-आऊट, शामनगर, बाबूपेठ येथील नेताजी चौक, तसेच भिवापूर येथील माता नगर येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांना संबोधित करताना ते बोलत होते. या सभांना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, माजी आमदार सुधीर पालवे, संजय बोदकुलवार, संजीव कुमार रेड्डी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्यासह महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. बावनकुळे म्हणाले की, भाजप सरकार सामान्य माणसाच्या घरापासून ते शहराच्या विकासापर्यंत ठोस काम करत आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, घरपट्टे, मालमत्ता हक्क हे विषय आम्ही निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता शासनाच्या अजेंड्यावर कायम ठेवले आहेत. चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणि महायुतीचे सक्षम नगरसेवक असणे अत्यंत गरजेचे आहे. विकासाची गती कायम ठेवायची असेल, तर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि स्थानिक पातळीवर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासारख्या विकासाभिमुख नेतृत्वाला बळ देणे आवश्यक आहे.
आम्ही ड्रोन सर्वेक्षणाद्वारे घरांचे मॅपिंग करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड, नकाशे आणि स्वामित्व हक्क मोफत देण्याचे काम करत आहोत. यासाठी लागणारा खर्च सरकार उचलणार आहे. काही भागांत आपण पट्टे वाटपही केले आहे. आपल्या भागातील पट्टे वाटप प्रक्रिया गतीशील रितीने पुढे जात असून, पुढील काही दिवसांत तुमच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा तुमच्या हातात असणार आहे. आपण लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिकचे पैसे जमा करणार आहोत. मात्र काँग्रेसशासित राज्यांमध्ये अशा योजना बंद करण्यात आल्या आहेत आणि आता महाराष्टातही ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे.
सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकू नका, असे पत्रच काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजना बंद करायला निघालेल्या काँग्रेसरूपी रावणाचा अंत या निवडणुकीत करण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आपण सूर्यघर योजनेअंतर्गत येथील नागरिकांना सूर्यघर लाहुन देणार आहोत. त्यामुळे पुढील १५ वर्षे नागरिकांना विजेचे बिल येणार नाही. विकासावर विश्वास ठेवा, काम करणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या सभांना नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.



