समर्थ कृषी महाविद्यालयात कृषी व्यवसाय व निर्यात क्षेत्रातील करिअर संधींवर विचारमंथन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे उच्च शिक्षणातील उत्कृष्टता उपक्रमांतर्गत विद्यार्थी-केंद्रित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांच्या मालिकेत “कृषी व्यवसाय, वृक्षारोपण, अन्न प्रक्रिया आणि कृषी-निर्यात क्षेत्रातील शिक्षण व करिअरच्या संधी” या विषयावर दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी एक विशेष विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले.हे सत्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट (IIPM), बंगळूरू यांच्या सहकार्याने दुपारी १२.०० वाजता झूम प्लॅटफॉर्मवर आभासी पद्धतीने घेण्यात आले. IIPM चे तज्ज्ञ वक्ते यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी निर्यात तसेच या क्षेत्रांतील उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले.या वेबिनारमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर नियोजनासाठी असे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी केले. तसेच उपप्राचार्य देवानंद नागरे यांनी विद्यार्थ्यांना या प्रकारच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. योगेश चगदळे यांनी विद्यार्थ्यांना एका ठिकाणी एकत्र बसवून महाविद्यालयात वेबिनारची आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा. विकास म्हस्के, प्रा. सचिन सोळंकी व प्रा. अरुण शेळके उपस्थित होते.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील बदलती व्याप्ती, आधुनिक संधी आणि उच्च शिक्षणाचे मार्ग याबाबत स्पष्ट दिशा मिळाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.



