स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाची सुरुवात – चंद्रपूर मनपातर्फे विविध उपक्रम

चांदा ब्लास्ट
शासन निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा 2025’ अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक विद्या गायकवाड यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आला .
देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबर रोजी सुरु होऊन 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत चालणाऱ्या या अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या वर्षी अभियानाची थीम “स्वच्छोत्सव” अशी असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा झेंडींचे रूपांतरण, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, स्वच्छ-हरित उत्सव तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात येतील.
महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवस दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
याबाबत आयुक्तांनी विशेष आढावा बैठक घेत प्रत्येक उपक्रम नियोजनबध्द रितीने आयोजित करण्याचे निर्देश दिले व त्यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या. प्राधान्याने शाळा व महाविद्यालयांना या उपक्रमांमध्ये सहभागी करुन विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयापासूनच स्वच्छतेचा संस्कार करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे नियोजन करावे तसेच सोसायट्यांमध्येही उपक्रम राबवावेत आणि यामध्ये स्वयंसेवी संस्थांना मोठया प्रमाणात सहभागी करुन घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
शासन निर्देशानुसार या अभियानात दुर्लक्षित अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व त्यांचे परिवर्तन, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबीर, स्वच्छ हरित महोत्सव तसेच स्वच्छता पुरस्कारांव्दारे स्वच्छता कार्याला प्रोत्साहन अशा प्रमुख घटकांकडे लक्ष देत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.अभियानांतर्गत 25 सप्टेंबर रोजी ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ राष्ट्रव्यापी श्रमदान घेण्यात येणार असुन 2 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिन’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रवार,शहर अभियंता रवींद्र हजारे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
“स्वच्छतेच्या या सामूहिक उत्सवात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून चंद्रपूर शहर अधिक स्वच्छ, हरित व आरोग्यदायी बनवावे.” – आयुक्त विद्या गायकवाड