सावली येथे मुलींसाठी सॉफ्ट स्किल्सवरील तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय येथील करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल तर्फे “सॉफ्ट स्किल्स फॉर प्रोफेशनल अँड कॉर्पोरेट सक्सेस” या विषयावर मुलींसाठी विशेष तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम नांदी फाउंडेशन यांच्या सहकार्याने पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलींना व्यावसायिक प्रगती व कॉर्पोरेट क्षेत्रातील यशासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे हा होता. प्रशिक्षणामध्ये संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी, संघभावना, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखत तंत्रे आणि कार्यस्थळावरील नैतिकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सज्ज होत असलेल्या तरुणींमध्ये आत्मविश्वास, ठामपणा आणि व्यावसायिक सादरीकरण कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी नांदी फाउंडेशनच्या सौ. मेघना पी. दुबे या अनुभवी सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक म्हणून उपस्थित होत्या. संवादात्मक सत्रे, गटचर्चा, भूमिकानाट्य आणि विविध प्रात्यक्षिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थिनींना संकोच दूर करून प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यास तसेच आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाण्यास प्रेरित केले.
प्रशिक्षण दररोज सकाळी ८.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले होते. विविध शाखांतील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. आधुनिक व्यावसायिक क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थिनींना अशा उपक्रमांचा लाभ घेऊन आपले करिअर घडविण्याचे आवाहन केले व रोजगारक्षमतेसाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संगानंद जी. बागडे व श्री. सचिन वाकडे (करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल) यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी अंमलबजावणी केली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थिनींनी दिलेल्या सकारात्मक अभिप्रायातून या सत्रांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून करिअर घडविण्यासाठी ही प्रशिक्षण मालिका अत्यंत प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाले.



