चंद्रपुरातील छत्रपती महोत्सवात देवाडा खुर्द शाळेची उत्तुंग भरारी
एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रावस्ती निमसरकार द्वितीय, वक्तृत्व स्पर्धेत माही वासेकर तृतीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
चंद्रपूर येथे सार्वजनिक छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 18, 19 व 20 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय छत्रपती महोत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंद्रपूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्रजी शिंदे होते. निमंत्रक म्हणून संतोषजी कुचनकर, सचिव मा. हरीश ससनकर तसेच मराठा सेवा संघाचे मा. दीपक जेऊरकर आणि मा. दिलीप चौधरी उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक गावांमधून स्पर्धकांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला होता. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
ता. पोंभुर्णा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, देवाडा खुर्द येथील दोन विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून जिल्हास्तरीय महोत्सवात शाळेचे नाव उज्ज्वल केले.
सांस्कृतिक कार्यक्रमातील लक्षवेधी ठरलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या श्रावस्ती बंडू निमसरकार हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” या एकपात्री अभिनयाचे प्रभावी सादरीकरण केले. या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांक मिळाला.
तसेच वक्तृत्व स्पर्धेत माही केमराज वासेकर हिने “माझे आवडते राजे छत्रपती शिवराय” या विषयावर उत्कृष्ट भाषण करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मुंबई येथील शिवव्याख्याते ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते श्रावस्ती निमसरकार आणि माही वासेकर यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जि.प. उच्च प्राथमिक शाळा देवाडा खुर्दच्या मुख्याध्यापिका डॉ. अल्का दीपक ठाकरे या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठ्या व्यासपीठावर संधी मिळत असून त्यातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळत आहे.
आदिवासी बहुल पोंभुर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि उत्तम मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल पालकांनी शाळेचे विशेष आभार मानले.
या यशामध्ये शाळेतील शिक्षक निलेश गिरडकर, अशोक पानसे, शामला तरवटकर, गजानन सावलीकर आणि सुधा धामणगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जिल्हास्तरीय छत्रपती महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमात देवाडा गावातील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.



