ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सासू व साळीवर विटेने हल्ला ; जावयाचा संतापजनक प्रताप

माय-लेकी जखमी; भद्रावती पोलीसांत गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       दारूच्या नशेत जावयाने सासू व साळीवर विटेने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गुळगाव येथे घडली. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत सासु वंदना रवींद्र नन्नवरे (वय ४५, रा. गुळगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तोंडी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मजुरीचे काम करीत असून त्या कुटुंबासह गुळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांना तीन मुली असून मोठ्या मुलीचे प्रेम समंध असल्याने यांचे लग्न गावातीलच रवि विठ्ठल वाकडे याच्यासोबत रीतीरिवाजांनुसार करण्यात आले होते.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जावई रवि वाकडे हा दारू पिण्याच्या सवयीचा असून तो वारंवार दारूच्या नशेत शिवीगाळ व वाद घालत असतो. दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास तो दारू पिऊन फिर्यादीच्या घरासमोर आला व शिवीगाळ करू लागला. यावेळी “का शिवीगाळ करता?” असा जाब विचारण्यासाठी फिर्यादी घराबाहेर आल्या असता, संतापाच्या भरात आरोपीने घरासमोरील वीट उचलून त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला.

तसेच फिर्यादीची लहान मुलगी कल्याणी हिलाही विटेने मारहाण करण्यात आली. तिच्या हनुवटीच्या डाव्या बाजूस दुखापत झाली आहे. घटनेनंतर गुळगाव तुकूम येथील वैभव बुरडकर यांच्या चारचाकी वाहनाने जखमींना ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींवर प्राथमिक उपचार केले.

या घटनेबाबत भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपी रवि विठ्ठल वाकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये