३२ वर्षांनंतरचा सुवर्णक्षण: जनता विद्यालय 1994-95 बॅचचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घूस, चंद्रपुर : १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रयास सभागृह, घुग्घूस येथे जनता विद्यालयाच्या 1994-95 बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा तब्बल ३२ वर्षांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत, मैत्रीचे बंध पुन्हा दृढ करत हा अविस्मरणीय क्षण सर्वांच्या मनात कोरला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात जनता विद्यालयाचे गुरुवर्य तथा विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी अशोक बेलेकर (मुख्याध्यापक, जनता विद्यालय), डॉ. विजय हेलवटे, विनायक आसुटकर, दिलीप मोरे, दिलीप कापसे सर, अरुण गंधारे, मोहन गंधारे, पांडुरंग पिंपळकर, मारुती रावजी कूसपुरे, संजय पठाण, चंद्रशेखरजी बोबडे, के.वाय. कुटेमाटे, छाया बत्तूलवार आणि अनया पामपतुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलनानंतर निलेश कापसे यांनी राष्ट्रगीत सामूहिकरित्या सादर केले. त्यानंतर दिवंगत गुरुजन व मित्रांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. स्वागत गीत पुष्पा उरकुडे आणि त्यांच्या संचाने सादर केले. स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक सॅमसन यांनी केले, तर पांडुरंग नांदे यांनी “शिवगर्जना” सादर करून वातावरण भारावून टाकले.
मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विवेक बोडे आणि पांडुरंग नांदे यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विशेष म्हणजे, 1994-95 बॅचचे विद्यार्थी आज महाराष्ट्रासह झारखंड, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत नोकरी व व्यवसाय करत असूनही वेळ काढून या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित राहिले. विविध राज्यांतून आलेल्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती हा कार्यक्रमाचा खास आकर्षण ठरला.
या स्नेहसंमेलनासाठी दोन ते तीन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. सॅमसन रामटेके, विजय बावणे, कमलाकर चहारे, राजू परागे, श्याम कुमरवार, संदीप काकडे, देवानंद रामटेके, प्रवीण देसाई, दीपा गादम, पुष्पा उरकुडे, अर्चना तिवारी, उज्वला दुर्गे, एकता भोगेवार यांसह सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना बालपणीच्या आठवणींची भेट देण्यात आली. सकाळी नाश्ता व दुपारी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी श्याम कुमरवार यांनी आभार प्रदर्शन करून स्नेहसंमेलनाची सांगता केली.
३२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत मैत्री, आठवणी आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी खरोखरच आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा ठरला.



