ताज्या घडामोडी

सिनगाव जहाँगीरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; ६५ वर्षीय वृद्धाकडून एक किलो गांजा जप्त

गुप्त माहितीच्या आधारे घरावर छापा; ३० हजारांचा गांजा जप्त, वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहाँगीर येथे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी एका घरावर छापा टाकून तब्बल १ किलो ६८ ग्रॅम गांजासदृश्य अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत रमेश रोडुबा सानप (वय ६५, रा. सिनगाव जहाँगीर, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजित किंमत ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिनगाव जहाँगीर येथील रमेश सानप याच्या घरात गांजासदृश्य अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत १६ नोव्हेंबर रोजी पहाटे १.१५ ते २.३० वाजेदरम्यान पोलिसांनी संबंधित घराची झडती घेतली. ही कारवाई पोलिस पथक, महसूल विभागाचे राजपत्रित अधिकारी, फोटोग्राफर, वजनकाटा धारक आणि दोन शासकीय पंच यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

घराची झडती घेतली असता एका तपकिरी रंगाच्या पिशवीमध्ये १ किलो ६८ ग्रॅम वजनाचा गांजासदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. त्याची बाजारातील अंदाजित किंमत ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. संबंधित पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाल्याने रमेश सानप याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम २० (ब) (ii) व ८ (क) अन्वये कायम अप. क्र. ५१२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितीन गणेशराव मिंड यांनी फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सविता कुवारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे (प्रभार देऊळगाव राजा), पोलिस निरीक्षक आशीष इंगळे (प्रभार देऊळगाव राजा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक सविता कुवारे आणि पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्यासह पोलिस पथक सहभागी होते.

ग्रामीण भागात अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी अधिक कठोर लक्ष ठेवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये