ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करंजीत २२ नोव्हेंबरला संविधानिक मूल्यांचा जागर

तुषार सूर्यवंशी यांचे भव्य जाहीर कीर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ संविधान सन्मान दिन, शहीद बिरसा मुंडा जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून संविधानिक मूल्यांचा जागर आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी करंजी येथील गांधी चौकात भव्य जाहिर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून सामाजिक समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि संविधानिक विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाषभाऊ धोटे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा लेखक, दिग्दर्शक, सुप्रसिद्ध गायक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिरुद्ध वनकर उपस्थित राहणार आहेत.

*कीर्तनातून संविधानिक विचारांचा जागर*

या कार्यक्रमात तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक भव्य जाहिर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता तुषार सूर्यवंशी आणि संच, नागपूर यांचा प्रबोधनात्मक भव्य जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

*मान्यवरांचा सत्कार व सन्मान*

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्करराव कुंदावार, सेवानिवृत्त शिक्षक नारायण तेलकापल्लीवार तसेच डॉ. आशिष नारायण तेलकापल्लीवार यांचा समावेश आहे.

*विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार*

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती करंजी/जोगापूर, गुरुदेव सेवा मंडळ करंजी, वीर बिरसा ब्रिगेड युवकसेना करंजी/जोगापूर आणि क्रांतिबा महात्मा फुले युवा विचारमंच करंजी यांनी पुढाकार घेतला आहे.

संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती समाजजीवनात रुजावीत, महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये