ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढा यात्रेसाठी स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांवर भर ; आ. जोरगेवार यांचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांसह आ. जोरगेवार यांनी केली पाहणी ; यात्रेपूर्वी पांदण रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वढा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त २४ नोव्हेंबर रोजी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेला विदर्भासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा येथे बैठक घेतली. यावेळी यात्रेसाठी स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, घुग्घुस पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी संगीता बांगडे, नायब तहसीलदार खंडारे, वढा सरपंच किशोर वराडकर, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री रवींद्र गुरनुले, ज्येष्ठ नेते प्रकाश देवतळे, अरुण तिखे, मंदिर समीतीचे शंकर वराडकर, बंडू पूरडकर, प्रभाकर गहोकर, महेंद्र वडस्कर, संतोष भोसकर, पुंजाराम सालुरकर, बादल पानघाटे, श्रिकांत चौधरी, विलास पूरडकर, संकेत मसे, संजय उमरे, उमेश नक्षिने, कैलास उमरे, यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्तिक पौर्णिमेनिमित्त वढा येथे भरणाऱ्या यात्रेला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यात्रेदरम्यान हजारो भाविक, श्रद्धाळू नागरिक तसेच व्यावसायिकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यात्रा परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या.

यात्रा परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वढा-पांढरकवडा मार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, पांदण रस्त्यांवर मुरूम टाकणे, नदीकाठावरील घाटाची जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता करणे, तसेच पार्किंगसाठी निश्चित केलेल्या जागेचे सपाटीकरण करून ती वाहतुकीसाठी योग्य करणे, अशा विविध कामांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय वढा रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता करणे, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करून सुरक्षेची व्यवस्था करणे आणि सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक असलेला खर्च सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच यात्रेच्या कालावधीत स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी घुग्घुस नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान वढा येथे तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संपूर्ण यात्रा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक नियोजन, पार्किंग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभतेने दर्शन घेता यावे आणि कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी निर्धारित वेळेत आवश्यक कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

यात्रेपूर्वी पांदण रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार वढा येथील मुख्य मार्गांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली असून, उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. यात्रेपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला दिले. दरवर्षी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. मात्र, हे पर्यायी मार्ग तयार झाल्यास यात्रेकरूंना वाहतुकीसाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार असून, मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

वढा येथील कार्तिक पौर्णिमेची यात्रा हा केवळ धार्मिक सोहळा नसून विदर्भातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या यात्रेची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जपत भाविकांना आनंददायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये