जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा अधिकाधिक लाभ द्या-पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
नाला व विहीर खोलीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी समित्या स्थापन करण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेच्या कामकाजाचा आढावा
वर्धा :_ जिल्ह्यातील मत्स्यबीज केंद्रांचे बांधकाम, सुधारणा व आधुनिकीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. तसेच जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आणि विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नाला खोलीकरणाच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी कृषी, जलसंधारण, वन आणि भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी. या समितीने मागील तीन वर्षांत झालेल्या नाला खोलीकरणाच्या कामांचा सविस्तर अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे विहीर खोलीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आणि भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती गठित करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी बांधकाम विभागाने आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करावेत. सर्व विभागांनी विकासकामांशी संबंधित प्रस्ताव कोणत्याही प्रकारचा विलंब न करता विहित कालमर्यादेत सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या. यावेळी कृषी, शिक्षण, जलसंधारण, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, वने व पोलिस विभागाच्या सविस्तर आढावा घेण्यात आला.



