चांदा पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ चांदा पब्लिक स्कूल येथे सोमवार दि. 16 नोव्हेंबर 2026 रोजी बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम आणि क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान आणि मुलांचे लाडके चाचा नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
बालदिनानिमित्त शिक्षकांनी सादर केलेल्या समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षिका श्वेता बहादे यांनी बालदिनाचे महत्त्व प्रभावी शब्दात विशद करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षिका शुभांगी वाकडे व राजु गोयलवार यांनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध मनोरंजक उपक्रमांमुळे व परिपाठामुळे मुलांच्या उत्साहाला उधाण आले.
बालदिनानिमित्त आयोजित क्रीडा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये हाऊसवाईज सहभाग नोंदवत खेळातील चैतन्य, खिलाडूवृत्ती आणि संघभावनेचा सुंदर परिचय करुन दिला. या संपूर्ण सोहळ्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले.
शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी बालपण हे जीवनातील सर्वात सुंदर आणि निरागस पर्व आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळे शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रीत न करता आपले छंद सुद्धा जोपासावे असे त्या म्हणाल्या.
पुस्तकी शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक कला, मनोरंजन आणि क्रीडा यांनाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे स्थान आहे. असा सकारात्मक संदेश प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका रुहीना तबस्सुम व प्राजक्ता उपरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख नदीम खान यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही सहकार्य केले.



