सायबर गुन्ह्यांत गोठवलेले बँक खाते अनफ्रीझ कसे करावे? वर्धा पोलिसांनी जाहीर केली ‘GRM पोर्टल’ची टप्प्याटप्प्याची माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान गोठवण्यात आलेली (फ्रीझ होल्ड), लीन-मार्क (Lien-marked) बैंक खाती अनफ्रीझ करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी व्हावी यासाठी महाराष्ट्र सायबर व वर्धा पोलीस प्रशासनाकडून GRM (Grievance Redressal Module) पोर्टलबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या किंवा बँकेमार्फत अर्ज करून खाते अनफ्रीझ करता यावे आणि वेळेची बचत व्हावी, हा या प्रक्रियेचा मुख्य हेतू आहे.
केस सोडवण्याची आणि खाते अनफ्रीझ करण्याची सविस्तर टप्प्याटप्प्याने प्रक्रियाः
१. बँकेत अर्ज करणे (कोणी व कुठे संपर्क साधावा?):
कोणी संपर्क साधावाः ज्या खातेदाराचे बँक खाते सायबर गुन्ह्यांच्या तपासाशी संबंधित संशयास्पद व्यवहारांमुळे गोठवले (Freeze) किंवा लीन (Lien) केले गेले आहे, अशा मूळ खातेदाराने (किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीने) संपर्क साधावा.
कुठे संपर्क साधावाः खातेदाराने ज्या बँकेत आपले खाते आहे, त्या स्वतःच्या गृह शाखेशी (Home Branch) प्रथम संपर्क साधून खाते
अनफ्रीझ करण्याबाबतचे लेखी निवेदन/अर्ज सादर करावा.
२. बँकेकडून सखोल पडताळणी व पोर्टलवर नोंदणीः
बैंक अधिकारी प्रथम त्या खातेदाराचे केवायसी (KYC – Know Your Customer) दस्तऐवज आणि संशयास्पद ठरलेले बँक व्यवहार (Bank Transactions) यांची प्राथमिक पडताळणी करतील.
सर्व माहिती व कागदपत्रे योग्य आढळल्यास, संबंधित बँक अधिकारी स्वतः ‘GRM पोर्टल’वर त्या खातेदाराच्या वतीने तक्रार नोंदवतील,
३. युनिक तक्रार आयडी (Unique Grievance ID) मिळणेः
बँकेने पोर्टलवर तक्रार सबमिट करताच प्रणालीद्वारे एक युनिक तक्रार आयडी (Unique Grievance ID – उदा. GRM123456) तयार होतो.
हा तक्रार आयडी तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो खातेदारास बँकेकडून किंवा सिस्टीम संदेशाद्वारे प्राप्त होतो, ४. तपास अधिकाऱ्याकडून (10) सखोल तपास व पडताळणीः
नोंदवलेली तक्रार डिजिटल माध्यमाद्वारे तात्काळ संबंधित प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याकडे (Investigating Officer – IO) पाठवली जाते.
तपास अधिकारी त्या खात्यातील व्यवहारांचा मार्ग (Transaction Trail) आणि खातेदाराने सादर केलेल्या संबंधित कायदेशीर पुराव्यांची व दस्तऐवजांची सखोल तपासणी करतात.
५. बैंक खाते अनफ्रीझ होणे किंवा लीन हटवणे:
तपास अधिकाऱ्यांची सर्व बाजूने पूर्ण खात्री पटल्यानंतर आणि तपास यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, खात्यावरील फ्रीझिंग किंवा लीन हटवण्याची शिफारस केली जाते.
यानंतर बँकेकडून खाते पूर्ववत चालू (Unfreeze) करण्यात येते आणि खातेदारास आपले पैसे वापरण्यास परवानगी मिळते.
महत्त्वाची सूचना व आवाहन:
केवळ GRM पोर्टलवर तक्रार नोंदवली म्हणजे खाते लगेच किंवा आपोआप अनफ्रीझ होत नाही. अंतिम निर्णय हा तपास यंत्रणा, सादर केलेली कागदपत्रे आणि तथ्यांच्या कायदेशीर पडताळणीवरच अवलंबून असतो.
“सायबर फसवणुकीला बळी पडू नका. सतर्क राहा आणि कोणतीही ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.”


