वैद्यकिय व शवविच्छेदन प्रक्रियेबाबत पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्याच्या तपासामध्ये वैद्यकिय गंभीर प्रकरणे व मृत्यूच्या घटनांमध्ये शवविच्छेदनाची प्रक्रिया ही गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, शवविच्छेदन अहवालातील वैद्यकीय निष्कर्षांचा तपासाशी योग्य समन्वय साधण्यासाठी पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये प्रभावी संवाद असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वैद्यकिय शवविच्छेदन प्रक्रियेसंदर्भात पोलीस अधिकारी व वर्धा जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चर्चासत्र श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा, आयोजित करण्यात आले.
या चर्चासत्रामध्ये मेडिको लीगल केसेस, गंभीर जखमी प्रकरणे, महिला व बालकांशी संबंधीत गुन्हे तसेच शवविच्छेदनापूर्वीची पोलीस कार्यवाही, घटनास्थळ पंचनामा, मृतदेहाची ओळख, मृतदेहाची सुरक्षित हाताळणी, आवश्यक कागदपत्रे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे, तसेच शवविच्छेदनादरम्यानआढळणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींची तपासाच्या दृष्टीने नोंद घेणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच मृत्यूचे कारण, मृत्यूची अंदाजे वेळ, जखमांचे स्वरूप, जखमा मृत्यूपूर्वीच्या किंवा मृत्यूनंतरच्या आहेत का, विषबाधा अथवा इतर संशयास्पद बाबी, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील वैद्यकीय तपासणी, आवश्यक नमुने व जैविक पुरावे संकलन, त्यांचे जतन व प्रयोगशाळेकडे पाठविण्याची प्रक्रिया याबाबत पोलीस व वैद्यकीयअधिकाऱ्यांमध्ये विचारविनिमय करण्यात आला.
गुन्ह्याच्या तपासामध्ये शवविच्छेदन अहवालाचे असलेले महत्त्व लक्षात घेता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्राथमिक निष्कर्ष व अंतिम शवविच्छेदन अहवाल तपास अधिकाऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे, तसेच तपासामध्ये उद्भवणाऱ्या वैद्यकीय बाबींविषयी आवश्यकतेनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी संशयास्पद मृत्यू, अपघाती मृत्यू, आत्महत्या, खून तसेच अज्ञात मृतदेहांच्या प्रकरणांमध्ये पोलीस व वैद्यकीय विभाग यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी परस्पर संपर्क व समन्वयाची कार्यपद्धती निश्चित करण्यावावतही विचारविनिमय करण्यात आला. वैद्यकीय निष्कर्ष व पोलीस तपास यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होऊन मृत्यूच्या घटनांचा तपास अधिक शास्त्रीय, वस्तुनिष्ठ व पुराव्याधारित पद्धतीने करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीकरीता श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा. श्री. प्रमोद मकेश्वर पोलीस उपअधीक्षक गृह, वर्धा. श्री. विनोद चौधरी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा. डॉ. श्री. राजसिंग पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक वर्धा. डॉ. श्री. इंद्रजित खांडेकर, वैद्यकिय अधिकारी कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम तसेच वर्धा जिल्ह्यातील शवविच्छेदन करणारे सर्व वैद्यकिय अधिकारी प्रत्यक्ष बैठकीकरीता हजर होते. तसेच विडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते….


