अनुदान रखडले, ट्रॅक्टर कृषी कार्यालयात आणले; लाभार्थ्यांचा संताप
अनुदानासाठी हेलपाटे मारूनही पदरी निराशा; दोन लाभार्थ्यांचे आंदोलनात्मक पाऊल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा :_ राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करून शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांचा संयम अखेर सुटला आहे. अनुदानाची रक्कम रखडल्याचा निषेधार्थ लाभार्थी भाजप पोंभुर्णा शहराध्यक्ष ऋषी मारोती कोटरंगे आणि दिनेश प्रभाकर नैताम यांनी आपले दोन ट्रॅक्टर थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आणून उभे केले. या आंदोलनात्मक पावलामुळे रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शासनाच्या अनुदानावर विश्वास ठेवून लाभार्थ्यांनी स्वतःची मोठी आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्टर खरेदी केले. मात्र, खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊनही अनुदानाची रक्कम खात्यावर जमा झालेली नसल्याने लाभार्थ्यांना कृषी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे कर्जाचा बोजा आणि आर्थिक अडचणी वाढत असल्याची नाराजी लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात बैलपोळ्याच्या दिवशी चेकठाणेवासना येथील सुषमा गुरुदेव पिंपळशेंडे यांनीही अनुदान रखडल्याच्या निषेधार्थ आपला ट्रॅक्टर कृषी कार्यालयात उभा केला होता. त्यानंतर आता आणखी दोन ट्रॅक्टर कार्यालयात उभे करण्यात आल्याने कृषी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनुदानासाठी लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याने संताप वाढत आहे. प्रलंबित प्रकरणांची तातडीने पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार अनुदानाची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



