आरोग्यसेवा पोहोचली थेट गावाच्या दारी ; इंजापूरात १२९ नागरिकांची तपासणी
आरोग्य केंद्र नांदा, उपकेंद्र खिर्डी व ग्रामपंचायत खिर्डीचा संयुक्त उपक्रम; सामाजिक दायित्वातून विविध तपासण्या मोफत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध व्हाव्यात, या सामाजिक दायित्वातून प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा, उपकेंद्र खिर्डी व ग्रामपंचायत खिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (१६ सप्टेंबर) ग्राम इंजापूर येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत खिर्डीच्या वतीने आरोग्य विभागाशी समन्वय साधून नागरिकांना विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
‘तिशीचा पल्ला तपासणी अन् सल्ला – लवकर तपासणी, योग्य निदान, वेळेवर उपचार’ या शासकीय मोहिमेअंतर्गत आयोजित या शिबिरात १२९ नागरिकांची नोंदणी व १२९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्ये १७ ECG, ६७ BP, ६७ रक्तातील साखर, ३० RDK द्वारे मलेरिया तपासणी आणि १२ BS रक्त नमुना तपासण्या करण्यात आल्या. तसेच मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली असून उपचाराधीन एका रुग्णाची नोंद करण्यात आली.
नागरिकांची वजन, उंची व BMI मापनासह सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला, निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन देण्यात आले. विविध आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सेवा गावातच मोफत उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली.
यावेळी सरपंच श्री. शामराव सलाम, उपसरपंच श्री. दिपक खेकारे, ग्रामसेवक श्री. राजाराम पोले, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत शेंडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. रंजन बद्रे, तसेच आरोग्य सहाय्यक श्री. सुरेश खाडे यांची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेवक रामेश्वर चव्हाण, प्रज्वल ताकसांडे, आरोग्य सेविका वर्षा गोतावडे, आशा गटप्रवर्तक आशा मत्ते तसेच गावातील सर्व आशा सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोलाचे योगदान दिले.
प्रतिक्रिया
“नागरिकांचे आरोग्य जपणे हे ग्रामपंचायतीचे सामाजिक दायित्व आहे. आजाराचे वेळीच निदान व्हावे आणि नागरिकांना गावातच योग्य आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले.”
दिपक खेकारे, उपसरपंच, ग्रामपंचायत खिर्डी



