लक्कडकोटमध्ये माकडांचा धुमाकूळ!
महिला व युवकावर माकडाचा हल्ला ; यापूर्वीही हल्ल्यांच्या घटना, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट गावात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, आता माकडांनी थेट ग्रामस्थांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच गावातील ललिता तिरुपती गाजंगवार या महिलेवर आणि सचिन झाडे या यावकावर माकडाने हल्ला केल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही माकडांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असतानाही वनविभागाकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लक्कडकोट परिसरात माकडांच्या टोळक्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरांच्या अंगणात, रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी माकडांचा मुक्तसंचार सुरू असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ललिता गाजंगवार आणि सचिन झाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. माकडांच्या हल्ल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे ग्रामस्थ सांगत असून, भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माकडांच्या टोळक्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, घराबाहेर पडतानाही नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने गावात पाहणी करून माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लक्कडकोटमधील वाढता माकडांचा उपद्रव हा आता केवळ त्रासाचा विषय राहिलेला नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
*वनविभाग आणखी किती वाट पाहणार?*
माकडांचा उपद्रव वाढत असतानाही त्यावर प्रभावी नियंत्रण का ठेवले जात नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच वन प्रशासन जागे होणार का?, असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून केला जात आहे.
*अजूनपर्यंत नुकसान भरपाई नाही*
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात माकडांनी माझ्या घरात घुसून संपूर्ण अन्न_धान्य व किराणा सामानाची नासधूस केली. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. माझ्या घरातील हजारो रुपयांच्या सामानाचे नुकसान झाले. मात्र, सहा महिन्यांचा काळ लोटूनही अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.
*_मालताबाई कोरवते, पीडित महिला, लक्कडकोट*



