जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी वान्मथी सी, सीईओं पराग सोमण यांच्या उपस्थितीत मानवी रांगोळी
जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानास सुरुवात ; पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आज एकाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभियानास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजाची मानवी रांगोळी साकारण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, परिविक्षाधिन आयएएस अधिकारी शोभिका पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, डॉ.ज्ञानदा फणसे, मनिषा कुरसंगे, कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, समाजकल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सुशील हिंमतसिंहका विद्यालयाचे विद्यालयाचे वर्ग 7 वीचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
शिक्षण विभागाने आज जिल्हाभर जनकल्याणकारी योजना, राष्ट्रीय प्रतिके, विकसित भारताची संकल्पना या विषयांवर शाळांमध्ये चित्रकला रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. समाजकल्याण विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे अशोक चक्र रेखाटले. सेलू येथे तहसिलदार डॅा.शकुंतला पाराजे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती शिबिर घेण्यात आले.
क्रीडा विभागाच्यावतीने शालेय बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली. आंजी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस विभागाच्यावतीने न्यू आर्ट्स कॅालेज येथे पोलिस निरिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सायबर जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.
आदिवासी विकास विभागाच्यावतीने विभागाच्या योजनांचा जनजागृती रथ जिल्ह्यात फिरवून त्याद्वारे योजनांची जनजागृती करण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.



