आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या, गणेश मंडळांत जनजागृती
माहिती व जनसंपर्कचा लोकसंवाद कार्यक्रमात ; योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : आपत्कालिन परिस्थितीत उपचारांवरील खर्च भागविता यावा, यासाठी केंद्राच्यावतीने आयुष्मान भारत व राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत या दोनही योजनांची माहिती वर्धा शहरातील लेलेवाडी येथील श्री.बाहुबली गणेश मंडळाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना देण्यात आली.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित या लोकसंवाद कार्यक्रमप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आयुष्मान भारत व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचे प्रभारी अधिकारी सारंग भुमरे, जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक दिलीप बोंडसे, ज्येष्ठ नागरिक प्रकाश रायटर तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आशिष शिंदे, प्रितेश बाहेकर, वेदांत शिंदे, ओंकार बंडेवार, भारती रायटर, तृप्ती पट्टेवार, प्रियंका बंडेवार, जोत्स्ना देशपांडे, मंजुषा तामगाडगे, सिद्धी शिंदे यांच्यासह परिसराती नागरिक उपस्थित होते.
शासनाच्यावतीने शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. केंद्र व राज्य शासनाच्या जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत विविध आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जातात. जिल्ह्यात योजनेंतर्गत खासगी व शासकीय रुग्णालयांचा समावेश योजनेसाठी नोंदणीकृत रुग्णालये म्हणून करण्यात आला आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल झाल्यापासून घरी जाईपर्यंत कोणत्याही प्रकारचा खर्च रुग्णांना करावा लागत नाही, असे यावेळी मंगेश वरकड व सारंग भुमरे यांनी सांगितले.
नागरीकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ आयुष्मान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे. हे कार्ड योजनेच्या पोर्टलवर विनामुल्य काढता येतात. पोर्टलवर योजनेसाठी नोंदणीकृत खासगी व शासकीय रुग्णालयांची यादी उपलब्ध असून ती घरबसल्या पाहता येते. आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड, राशनकार्ड, रहिवासी पुरावा आदी कागदपत्रांची आवश्यक्ता आहे. योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्डला आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
आयुष्मान भारत कार्ड असलेल्या कुटूंबाला वर्षाला 5 लाखापर्यंतचे उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य उपलब्ध होतात. आजारावर 5 लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होत असल्यास उर्वरीत रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. योजनेत समाविष्ठ आजारांची यादी तसेच उपचार करण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयाची यादी आयुष्मान भारत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



