राज्याला निसर्गसंपन्न बनविण्यासाठी सामुदायिक वृक्षलागवडीची गरज – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
३०० कोटी वृक्ष लागवड, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : विकसित भारताचे उद्दिष्ट गाठत असतांना पर्यावरणाचा समतोल, वृक्षलागवड व संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करून यास लोकचळवळ बनवावे आणि सामूहिक प्रयत्नातून राज्याला हिरवेगार, निसर्गसंपन्न बनविण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
विकास भवन येथे वन विभागाच्यावतीने ३०० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपवनसंरक्षक हरविर सिंह, विभागीय वनअधिकारी सुहास बढेकर, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, ॲक्सिस बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजू पवार आदी उपस्थित होते.
पिण्याचे पाणी विकत घेऊन प्यावे लागेल असा कुणी विचारही केला नसेल. परंतू आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कोरोना काळात ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली होती. कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची वेळ येऊ नये यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे आवश्यक असून मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्याची गरज आहे.
राज्य शासनाने २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. सामाजिक कार्यामध्ये जिल्ह्यातील अनेक संस्थांचे नाव राज्यात घेतले जाते. अशा संस्थांनी वृक्षारोपणासाठी चळवळ निर्माण करुन सामाजिक कार्यात योगदान द्यावे. यासाठी संस्थांना शासनाच्यावतीने काही मदत लागल्यास देण्यात येईल, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
यावर्षी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद वर्ध्यात झाली. हे तापमान कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन वसुंधरेचे संरक्षण करण्याची गरज आहे. वृक्ष हा जात, पंथ, समाज न पाहता प्राणवायु देत असतो. त्याचे संवर्धन करणे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे सुधीर पांगुळ म्हणाले.
प्रास्ताविकात सुहास बढेकर यांनी यावर्षी विविध योजनेतून एकुण २२ रोपवन स्थळावर १३६.८५ हेक्टर क्षेत्रावर २.०६ लक्ष रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागामार्फत २.३५ लक्ष वृक्ष लागवड करण्यात आली असून ३०० कोटी वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यातील इतर यंत्रणांनी आजपर्यंत ६.७० लक्ष वृक्ष लागवड केली असल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते निसर्ग सेवा समिती, वैद्यकीय जनजागृती मंच, वृक्ष सेवा समिती, ग्रामपंचायत पडेगाव, यशवंत विद्यालय वायफड, ग्रामपंचायत सारवाडी, नवोदय विद्यालय सेलूकाटे, एएमटीएस कॉन्वेन्ट मसाळा, वृक्षमित्र परिवार, आशिष भोयर, प्रहार समाज जागृती संस्था, वृक्षवल्ली आम्हा सोयरे संस्था, हरीत क्रांती ग्रुप, रोटरी क्लब वर्धा व बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांना पाणी पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिल्याबद्दल ॲक्सिस बॅकेच्या व्यवस्थापकाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वृक्ष लागवड संस्थांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी, वन्यप्रेमी, वृक्षप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



