ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरातून सुरू झालेल्या पोलीस पाटील विमा योजनेचा पहिला प्रत्यक्ष लाभ

कै. मनोज कामतवार यांच्या कुटुंबाला ४४ लाखांची मदत : पोलीस पाटील संघटनेचे योगेश मत्ते यांच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      पोलीस पाटलांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात पुढाकार घेऊन सुरू करण्यात आलेल्या अपघाती विमा योजनेचा पहिला प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. साखरवाही येथील पोलीस पाटील कै. मनोज नानाजी कामतवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अॅक्सिस बँकेच्या सॅलरी अकाउंटशी संलग्न विमा योजनेतून ४४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

कै. मनोज कामतवार यांचे १ मे २०२६ रोजी अपघाती निधन झाले. या विमा योजनेनुसार पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू झाल्यास ४० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. तसेच दोन वर्षांपेक्षा अधिक, तर दुसऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांच्या कुटुंबाला ४० लाख रुपये अपघाती विमा आणि ४ लाख रुपये अपत्य विमा, असे एकूण ४४ लाख रुपयांचे विमा संरक्षण मंजूर झाले. या रकमेचा धनादेश चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात त्यांच्या वारसांना प्रदान करण्यात आला.

कै. मनोज कामतवार हे मूळचे भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथील रहिवासी होते. त्यांचे आजोळ साखरवाही येथे असल्याने बालपणीच ते आई-वडिलांसोबत साखरवाही येथे गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. साखरवाही येथेच त्यांनी पोलीस पाटील म्हणून जबाबदारी पार पाडली.

विशेष म्हणजे, पोलीस पाटलांसाठी अॅक्सिस बँकेच्या सॅलरी अकाउंटशी जोडलेले हे विमा संरक्षण चंद्रपूर जिल्ह्यातून पुढाकार घेऊन सुरू करण्यात आले. या योजनेचा पहिला प्रत्यक्ष विमा दावा देखील चंद्रपूर जिल्ह्यातच मंजूर झाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुणजी बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष योगेश मत्ते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस पाटलांमध्ये या विमा योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. सुरुवातीला अॅक्सिस बँक खासगी बँक असल्याने काही पोलीस पाटलांमध्ये योजनेबाबत साशंकता होती. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेचे स्वरूप, विमा संरक्षण आणि त्याचे फायदे समजावून सांगितल्यानंतर अनेक पोलीस पाटलांनी अॅक्सिस बँकेत सॅलरी अकाउंट सुरू केले.

या प्रयत्नांमुळे अपघाती निधनानंतर कै. मनोज कामतवार यांच्या कुटुंबीयांना ४४ लाख रुपयांची मदत मिळू शकली. त्यामुळे पोलीस पाटलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या या विमा योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये