डीजेवरील निर्बंध शिथिल करा; उत्सवांच्या आनंदावर मर्यादा नको – रोहित बोम्मावार
ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळून डीजेला परवानगी देण्याची मागणी; गणेशोत्सव मंडळे व युवकांच्या भावना लक्षात घेण्याचे प्रशासनाला आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे व ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत लागू असलेल्या निर्बंधांमुळे अनेक सार्वजनिक मंडळे आणि युवकांमध्ये नाराजी असल्याचे सांगत, नियमांच्या चौकटीत डीजे वाजवण्यास परवानगी देऊन निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी साथ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहित बोम्मावार यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सध्या ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत असलेल्या मर्यादा तसेच साऊंड सिस्टीमच्या संख्येवरील निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळे व विविध उत्सव समित्यांना अडचणी येत असल्याचे बोम्मावार यांनी म्हटले आहे. ध्वनीप्रदूषणाबाबतचे कायदेशीर नियम, निर्धारित वेळा आणि डेसिबल मर्यादांचे पालन होणे आवश्यकच आहे; मात्र त्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना व्यवहार्य परवानगी मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे.
“महाराष्ट्राची उत्सव परंपरा ही सामाजिक एकोपा, संस्कृती आणि तरुणांच्या उत्साहाशी जोडलेली आहे. कायद्याचा सन्मान राखून उत्सव साजरे झाले पाहिजेत; मात्र नियमांच्या नावाखाली उत्सवांच्या आनंदावर अनावश्यक मर्यादा येऊ नयेत. प्रशासनाने मंडळे आणि युवकांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक व व्यवहार्य निर्णय घ्यावा,” असे रोहित बोम्मावार यांनी म्हटले आहे.
विशेषतः गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दहीहंडी तसेच इतर सार्वजनिक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हजारो युवक आणि नागरिक सहभागी होत असतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण नियंत्रणाचे नियम कायम ठेवून, डीजे व साऊंड सिस्टीमसंदर्भातील निर्बंधांचा प्रशासनाने फेरविचार करावा आणि स्पष्ट, समान व व्यवहार्य नियमावली लागू करावी, अशी मागणी बोम्मावार यांनी केली.
यासंदर्भात आवश्यकता भासल्यास गणेश मंडळे, उत्सव समित्या, युवकांचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
“कायदा पाळू, नियम पाळू; पण आपल्या उत्सवांचा उत्साहही जपू!” अशी भूमिका मांडत प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन रोहित बोम्मावार यांनी केले आहे.



