आरसीईआरटीमध्ये ‘आरसीईआरटीचा राजा’ गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथे गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांचे मार्गदर्शनात ‘आरसीईआरटीचा राजा’ या संकल्पनेतून साकारलेल्या गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली असून, महाविद्यालय परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
महाविद्यालयाच्या गणेशोत्सव समितीच्या वतीने १४ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक भारतीय संस्कृती आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण यांचा सुंदर संगम साधत गणेशोत्सवाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
गणरायाची आकर्षक मूर्ती, फुलांची सजावट, समई, पारंपरिक वाद्यांची प्रतीकात्मक मांडणी तसेच कलात्मक सजावटीमुळे महाविद्यालयातील गणेशोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि संघभावनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गणेशोत्सव समितीच्या नियोजनानुसार दररोज विविध विभागांकडे उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या सर्व विभागांनी ही जबाबदारी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पाडली.
या गणेशोत्सवात महाविद्यालयातील सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. पुढील पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे आरसीईआरटीच्या परिसरात उत्सवी वातावरण राहणार आहे.



