ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत १७ सप्टेंबरला ‘महाराजस्व समाधान शिबिर’

_आरोग्य तपासणीसह महसूल विभागाच्या विविध शासकीय सेवा नागरिकांच्या दारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज आणि जलद उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्य व शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून आयोजित हे शिबिर गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत गांधी चौक, गोंडपिपरी येथील श्री राम सेना गणेश उत्सव व्यापारी मंडळाच्या परिसरात होणार आहे.

या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा नागरिकांना एकाच ठिकाणी लाभ घेता येणार आहे. प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, शासकीय योजनांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे, नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नवीन नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी व मागणीपत्र, प्रलंबित घरपट्टी व विद्युत जोडणीस मंजुरी, आधारकार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याशिवाय विविध विभागांच्या संयुक्त सहभागातून नागरिकांच्या शासकीय कामांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध कार्यालयांच्या चकरा मारण्याऐवजी नागरिकांना आवश्यक सेवांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन व सुविधा मिळणार आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

*आरोग्य तपासणीचीही सुविधा*

शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महसूल सेवांसोबतच नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा (शुगर) तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन, गर्भवती व मातांसाठी समुपदेशन, कुपोषण व रक्तक्षय तपासणी आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये