ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी ५० एकर जमीन हस्तांतरित करा – आ. सुधीर मुनगंटीवार

आ.मुनगंटीवार यांची जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे मागणी; डेंटल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी जमीन आवश्यक

चांदा ब्लास्ट

रुग्णांना अत्याधुनिक उपचारांसाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी दीर्घकालीन नियोजनावर आ.मुनगंटीवार यांचा भर

चंद्रपूर – चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावेत आणि गंभीर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना मोठ्या शहरांकडे जाण्याची वेळ येऊ नये, या रुग्णकेंद्रित भूमिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरलगतची सुमारे ५० एकर शासकीय जमीन वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली आहे. भविष्यातील आरोग्यसेवेच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन डेंटल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज आणि अन्य अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच परिसरात विकसित करण्यासाठी ही जमीन उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री म्हणून कार्यरत असताना चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी तसेच कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे चंद्रपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. रुग्णांच्या उपचाराला सर्वोच्च प्राधान्य देत, भविष्यातील आरोग्य गरजांचा विचार करून सुविधा उभ्या करण्याची आ.मुनगंटीवार यांची भूमिका या मागणीतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

अलीकडेच चंद्रपूरच्या शासकीय नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाली असून, त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. याचबरोबर चंद्रपूर येथे डेंटल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लागून असलेली सुमारे ५० एकर शासकीय जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जमीन उपलब्ध झाल्यास डेंटल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, शैक्षणिक विभाग, रुग्णालयीन सुविधा, विद्यार्थी वसतिगृहे, पार्किंग, अंतर्गत रस्ते आणि इतर पूरक पायाभूत सुविधांचा एकात्मिक आणि नियोजनबद्ध विकास करता येणार आहे.

चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील नागरिकांना उच्चस्तरीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चंद्रपूरला एक सक्षम वैद्यकीय केंद्र म्हणून विकसित करण्याची क्षमता आहे. विशेषतः कॅन्सर तसेच विविध गंभीर आजारांच्या उपचारांसाठी रुग्णांना नागपूर, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचावा, हा या संपूर्ण प्रयत्नांचा केंद्रबिंदू असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सदर जमीन हस्तांतरणासाठी महसूल विभागाच्या स्तरावर आवश्यक तपासणी, मोजणी, अभिलेखांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही आ.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रपूरला केवळ वैद्यकीय महाविद्यालय असलेले शहर न बनविता, पूर्व विदर्भातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि अत्याधुनिक उपचारांचे सक्षम केंद्र बनविण्याचा संकल्प या मागणीमागे आहे. त्यासाठी आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणे ही पुढील विकासाची महत्त्वाची पायरी असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात अधोरेखित केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये