पालडोह जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तान्हा पोळा उत्साहात
मातीच्या बैलांच्या प्रदर्शनात १५६ विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट बैलांना रोख बक्षिसे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद हायस्कूल, पालडोह या जिल्ह्यातील ३६५ दिवस कार्यरत असलेल्या शाळेत विविध सण-उत्सव अभिनव पद्धतीने साजरे करण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार शाळेत यंदाही तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. मागील नऊ वर्षांपासून शाळेत मातीच्या बैलांची प्रदर्शनी आयोजित करण्यात येत असून, यंदा तब्बल १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तसेच पालकांच्या सहकार्याने मातीपासून आकर्षक बैल तयार करून त्यांची सजावट केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या प्रदर्शनाला पालक, शेतकरी तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनाला टेकामांडवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मडावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मातीच्या बैलांची पाहणी करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली. निवड समितीत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच गावातील शेतकरी पालक सहभागी झाले होते.
प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना झाडीपट्टी कलेची ओळख करून देण्यात आली. शाळेचे शिक्षक राजेंद्र परतेकी यांच्या पुढाकारातून झाडीपट्टी कलाकार हर्षल गुरनुले यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण केले. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन होण्यासोबतच पारंपरिक लोककलेविषयी जिव्हाळा व आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व १५६ विद्यार्थ्यांना रजिस्टरचे वाटप करण्यात आले. गडचांदूरचे नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी विद्यार्थ्यांना ही रजिस्टर भेट म्हणून दिली. तसेच तान्हा पोळा प्रदर्शनातील उत्कृष्ट तीन बैलांना ठाणेदार मडावी यांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी ३०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १०० रुपये असे बक्षीस देण्यात आले.
या प्रसंगी सखुबाई पवार, नारायण बाजगीर, राम वारलवाड (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष), सुभाष देवकाते आदी उपस्थित होते.
मागील नऊ वर्षांपासून तान्हा पोळ्यानिमित्त मातीच्या बैलांचे प्रदर्शन यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी शिक्षक राजेंद्र परतेकी यांचे विशेष योगदान राहिले आहे. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र दिगदेवतुलवार तसेच परतेकी,आडे,खवशी,गाकरे, कू. इंझळकर,कोटनाके,ढेंगेकर,शेंडे,धुळगुंडे आणि सुरोशे यांनी शुभेच्छा दिल्या.



