हजारो सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्र वांढरे दांम्पत्यांचा सत्कार
चेतनसिंह गौर आणि मित्रपरिवार मार्फतीने कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
मानव _ वन्यजीव संघर्ष रोखणे, वृक्षलागवडीसाठी जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी ब्रीद उराशी घेऊन काम करणाऱ्या तेलंगणा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात कार्यरत “निसर्ग सखा” बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे यांचा नुकताच सपत्नीक सन्मान करण्यात आला. निमित्त होते गोंडपिपरीचे नगरसेवक चेतनसिंह गौर आणि मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे. गोंडपिपरीतील या वांढरे दांम्पत्यांनी आजतागायत हजारो सापांना जीवनदान दिले, हे विशेष.
मध्यचांदा वनविभागा अंतर्गत येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन व वन्यजीव आहेत. तेवढ्याच प्रमाणात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना दिसून येतात. यावर आळा घालण्यासाठी म्हणून वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असतात. अशावेळी वनविभागाच्या मदतीला म्हणून निसर्ग सखा संस्था नेहमीच सक्रिय असते. संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे, त्यांची पत्नी अश्विनी वांढरे यांच्या नेतृत्वात युवकांची टीम वनविभागाच्या मदतीला काम करीत असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळते.
वृक्षलागवडीसाठी जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी या संस्थेचे स्वयंसेवक तत्पर असतात. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या दांम्पत्यांनी “सर्पमित्र” म्हणून आजतागायत हजारो सापांना जीवनदान दिले आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात सापाला पकडण्यासाठी कुठल्याही गावखेड्यातून फोन आला की, क्षणाचाही विलंब न करता वांढरे मदतीला धावतात.
समाजाभिमुख असलेल्या या कार्याची दखल घेऊन वांढरे दांम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चेतनसिंह गौर आदींची उपस्थिती होती.



