श्रमदानातून महापांढरवाणीचा विकासाचा नवा आदर्श
गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांची भेट; तीन-चार किलोमीटर पायी चालत वृक्ष व बांबू लागवडीची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महापांढरवाणी येथील ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानातून हाती घेतलेल्या वृक्षलागवड व बांबू लागवड उपक्रमाची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती जिवतीचे गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांनी मंगळवारी महापांढरवाणी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तब्बल तीन ते चार किलोमीटर पायी चालत लागवड क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
ग्रामस्थांनी एकजुटीने आणि श्रमदानाच्या माध्यमातून राबविलेला वृक्षलागवड व बांबू लागवडीचा उपक्रम हा पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगारनिर्मिती आणि ग्रामविकासाला चालना देणारा आदर्श उपक्रम असल्याचे गटविकास अधिकारी दोडके यांनी सांगितले. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून गावातील नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे वापर करून विकासकामे हाती घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. शेतीपूरक व्यवसाय, पर्यावरण संवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधून गावाचा शाश्वत विकास साधण्यावर त्यांनी भर दिला.
दरम्यान, लागवड क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी आवश्यक पांदण रस्ता तसेच पाण्याची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ग्रामस्थांच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने केशरी आंबा व सीताफळाची पाच एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी आराखडा तयार करून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी दोडके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत श्रमदान, वृक्षलागवड, शेतीपूरक व्यवसाय, रोजगारनिर्मिती आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीप्रसंगी गावपाटील मानकू पाटील धुर्वे, सरपंच जंगू कोटनाके, जि.प. प्राथमिक शाळा येरमी-येसापूरचे मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम,चांदेकर, बासनवार, ग्रामसेवक नगराळे, रोजगार सेवक केशव कुमरे, सामूहिक वनव्यवस्थापन समितीचे मोहन आत्राम व समितीचे सर्व पदाधिकारी, तसेच तुकाराम धुर्वे, अनिल आळे, बादू आळे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या सहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेला वृक्षलागवड व बांबू लागवडीचा उपक्रम हा पर्यावरण संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि ग्रामविकासाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. गटविकास अधिकारी दोडके यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे या उपक्रमाला प्रशासनाचे मार्गदर्शन व अधिक बळ मिळाले आहे.



