ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साटोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याकडून पाहणी

आशा प्रशिक्षण सभागृह व गटप्रवर्तक कार्यालय बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी साटोड-आलोडी येथील नागपूर वळणरस्त्यावरील साटोडा चौक येथे 8 कोटी रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच बांधकाम उत्तम दर्जाचे तसेच तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.

साटोडा येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. यासाठी इमारतीचे बांधकाम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावे. वरच्या माळ्यावर जिल्ह्यातील आशांसाठी प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशस्त असे सभागृह तसेच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास 70 गट प्रवर्तकांसाठी स्वतंत्र सुसज्ज कार्यालयाची निर्मिती करावी. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून बांधकाम करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी बांधकाम विभागाला केल्या.

वर्धा शहरालगत असलेल्या गावांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेता या गावातील नागरिकांना गावातच चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करुन देण्यासाठी बोरगाव मेघे, सालोड, पिपरी मेघे व साटोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले

साटोडा येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या आरोग्य केंद्रात नागरिकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना खानपान सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बचत गटांना गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार यांनी बांधकामाची माहिती दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये