जिवती शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला!
नगरपंचायतीने धूर फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती नगरपंचायत हद्दीतील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन जिवती नगरपंचायतीने संपूर्ण शहरात फागिंग (धूर फवारणी) मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पावसामुळे शहरातील नाल्या, गटारे, सखल भाग तसेच विविध ठिकाणी पाणी साचून राहत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषतः बाजारपेठ, भाजी मार्केट, मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळांमध्ये डासांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
*प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज*
डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जिवती नगरपंचायत प्रशासनाने बाजारपेठ, भाजी मार्केट, निवासी भाग, गटारे, नाले व सखल परिसरात नियमित फागिंग करावी. तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा करून गटारे व नाल्यांची स्वच्छता करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिवती नगरपंचायतीने केवळ तक्रारींची प्रतीक्षा न करता तातडीने फागिंग मोहीम सुरू करून शहरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



