ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिंपरीत सरपंच आरक्षणाचा फैसला ; कुठे संधी..,कुठे धक्का..!

५० ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर ; २५ जागा सर्वसाधारण तर २५ जागा विविध प्रवर्गांसाठी राखीव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंडपिंपरी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (४ सप्टेंबर) जाहीर झाले. तहसील कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीनंतर गावागावांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. कुठे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या, तर कुठे आरक्षणामुळे अनेकांच्या तयारीला ब्रेक लागला आहे.

सन २०२५ ते २०३० या कालावधीतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच नव्याने गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण ५० सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी २५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जातीच्या ९ जागांपैकी ४, अनुसूचित जमातीच्या ८ पैकी ४, नागरिकांचा मागास प्रवर्गातील ८ पैकी ४, तर सर्वसाधारण प्रवर्गातील २५ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे महिला आरक्षण असलेल्या गावांमध्येही सरपंचपदासाठी इच्छुकांची चुरस वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे महिला आरक्षण असलेल्या २१ ग्रामपंचायतींमध्ये आता पुरुष राजकारण्यांकडून महिला उमेदवारांची शोधाशोध सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूकपूर्वीच गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे आता उमेदवार, गट आणि सरपंच पदाची बाजी कोण मारणार?, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

*अनुसूचित जाती* : फुरडीहेटी, धानापूर, चेकपिपरी, अडेगाव, चेक दुबारपेठ.

*अनुसूचित जाती (महिला)* : कन्हाळगाव, वडकुली, चेक बेरडी, वटराणा.

*अनुसूचित जमाती* : दरुर, बोरगाव, सकमूर, सालेझरी

*अनुसूचित जमाती (महिला)* : कोरंबी, नंदवर्धन, चेकदरुर, तारसा बुज.

*नागरिकांचा मागास प्रवर्ग* : नांदगाव, खराळपेठ, लाठी, भंगाराम तळोधी.

*नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)* : तारडा, चेक नांदगाव, कुडेसावली, चेक घडोली

*सर्वसाधारण* : सोमनपल्ली, चेकलिखतवाडा, वेजगाव, चेकपारगाव, करंजी, घाबा, डोंगरगाव, विहीरगाव, तोहोगांव, धामनगाव, किरमिरी, परसोडी.

*सर्वसाधारण (महिला)* : घडोली, गणेशपिपरी, वडोली, वेडगाव, हिवरा मो., पानोरा, सुपनगाव, सोनापूर देशपांडे, चक बोरगाव, आक्सापूर, विठ्ठलवाडा, पोडसा, गोजोली मक्ता.

*आरक्षणाने गावागावांत राजकीय हालचालींना वेग*

सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट झाल्याने आता गावागावांत उमेदवारांची जुळवाजुळव, गटबाजी आणि मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातून तयारी करणाऱ्या इच्छुकांना आरक्षणामुळे माघार घ्यावी लागू शकते, तर राखीव प्रवर्गातील इच्छुकांसाठी निवडणुकीची संधी निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये