ज्ञानदानाच्या तपश्चर्येला जिल्हास्तरीय सलाम.!
कवी प्रशांत भंडारे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.राजेश डोंगरे
शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल ; विद्यार्थ्यांप्रती समर्पित सेवाभाव आणि साहित्यिक योगदानाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
गोंडपिपरी :_ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलोरा हेटी, पंचायत समिती गोंडपिपरी येथील प्राथमिक शिक्षक तथा कवी प्रशांत भंडारे यांना प्रतिष्ठेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे प्रशांत भंडारे यांनी आपल्या कार्यातून एक आदर्श शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा, समर्पणभाव, शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यामुळे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
शिक्षण क्षेत्राबरोबरच प्रशांत भंडारे हे साहित्य क्षेत्रातही सक्रिय असून कवी म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि मानवी मूल्यांशी निगडित विषयांवर त्यांच्या साहित्यिक लेखनातून प्रभावी अभिव्यक्ती दिसून येते.
त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाची तसेच साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर यांच्यासह शिक्षक बांधव, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“कर्तव्यनिष्ठ शिक्षकाला मिळालेला हा सन्मान म्हणजे केवळ वैयक्तिक गौरव नसून संपूर्ण शाळा आणि शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहेत.
कवी प्रशांत भंडारे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे फुलोरा हैती परिसरासह गोंडपिपरी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे



