ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूसमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांचा कडक ॲक्शन

सराईत गुन्हेगार तीन महिन्यांसाठी जिल्हाबाहेर

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर : आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, यासाठी घुग्घूस पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर घुग्घूस पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका २८ वर्षीय सराईत गुन्हेगाराविरुद्ध चंद्रपूर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हाबदराची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे.

सदर युवक हा पंचशील चौक, विद्या टॉकीजच्या मागे, घुग्घूस येथील रहिवासी असून, त्याच्याविरुद्ध घुग्घूस पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेला निर्माण झालेला धोका तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ही ठोस कारवाई केली.

तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

चंद्रपूर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर सराईत गुन्हेगाराला तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला नागपूर येथे सोडण्यात आले.

जिल्हाबदरच्या कालावधीत त्याने बिनापरवानगी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्याच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घुग्घूस पोलिसांनी असामाजिक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

घुग्घूस पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत यांनी नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, गैरप्रकार किंवा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये