प्रसिद्धीचा हव्यास नाही, सेवाभावातून स्वच्छतेचा वसा!
कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचा वर्धापन दिन उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा बाह्य संस्थेची मदत न घेता, केवळ सामाजिक बांधिलकीतून स्वच्छतेचा वसा जपणाऱ्या गवराळा येथील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीने आपल्या कार्याचे एक वर्ष पूर्ण केले. यानिमित्त राजमनी गार्डन, रेल्वे स्टेशन रोड येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात समितीचे ज्येष्ठ सदस्य स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छतेचे कार्य करीत आहेत. वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेले सदस्यही नियमितपणे या कार्यात सहभागी होत असून, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावातून समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे. संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता, समाजप्रबोधन आणि समाजसेवेच्या विचारांपासून प्रेरणा घेत समितीने वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विवेक सरपटवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप मांढरे, राष्ट्रीय कीर्तनकार सुवर्णा ताई पिंपळकर, प्रकाश पिंपळकर, राजुरकर सर, प्रबोधनकार विशाल गावंडे, ज्येष्ठ सदस्य बबन पाटील जीवतोडे, उद्धवराव निळे, शामराव पाटील खापणे आणि निळकंठजी आत्राम उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष मंगेश येरमे, मार्गदर्शक राजेश बदखल, संघटक लिमेश माणूसमारे, रमेशजी खातखेडे यांच्यासह समितीचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे मार्गदर्शक राजेश बदखल यांनी केले. संचालन समितीचे प्रवर्तक लिमेश माणूसमारे यांनी केले, तर अजय बोंडे यांनी आभार मानले.
गवराळा स्मशानभूमीत फलकाचे अनावरण
वर्धापन दिनानिमित्त गवराळा येथील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता समितीच्या फलकाचे अनावरण ज्येष्ठ सदस्य निळकंठजी आत्राम व कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक सरपटवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश संपूर्ण भद्रावती शहरात पोहोचवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रसिद्धी किंवा बाह्य मदतीची अपेक्षा न ठेवता ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उभा केलेला हा उपक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संत गाडगे महाराज यांचे विचार केवळ अभिवादनापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार अध्यक्ष मंगेश येरमे आणि मार्गदर्शक राजेश बदखल यांनी व्यक्त केला.
स्वच्छतेचा हा सेवाप्रवास पुढेही अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘स्वच्छ भद्रावती, सुंदर भद्रावती आणि निरोगी भद्रावती’ या संकल्पनेसह तसेच जगन्नाथ महाराज यांचा जयजयकार करीत कार्यक्रमाची सांगता झाली.



