मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा निषेध मोर्चा
एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यासह मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी : तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
निवडणूक आयोगाच्या कामकाजातील कथित अनियमितता, मतदार यादीतील फेरफार आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेच्या विरोधात भद्रावतीत काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आणि युवा नेते प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भद्रावती तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करीत घोषणा दिल्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत, तसेच ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याबाबत विचार करावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख सुमित मुडेवार, शहर काँग्रेसचे सुनील नामोजवार, इंटक नेते धनंजय गुंडावार, काँग्रेसचे सुभानभाई सौदागर, शिवसेनेचे सुयोग भोयर यांच्यासह नगरसेवक अनिल पडोळे, प्रथम गेडाम, आशिष देहारकर, अमोल दैवलकर, संदीप चटपकर, बाबूभाई, तसेच नगरसेविका उषा जाधव, पल्लवी तामगडे, कल्पना भुसारी, कल्पना मत्ते आणि सुनीता खंडाळकर आदी उपस्थित होते.
लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि निवडणूक व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे युवा नेते प्रवीण काकडे यांनी स्पष्ट केले.



