दुष्काळामुळे महिलांकडील कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी
महिलांचा मोर्चा; उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर, त्रास दिल्यास धडा शिकवण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
महागाव : दुष्काळाच्या सावटामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांकडील कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी जन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आली.
याबाबत महिलांनी मोर्चा काढून संबंधित प्रशासनाला निवेदन सादर केले. दुष्काळामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणे दुरापास्त झाले असून, मिळणारे अल्प उत्पन्न कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच अपुरे पडत आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरण्याचा दबाव महिलांवर टाकला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
काही ठिकाणी कर्जवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून महिलांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करून मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली तात्पुरती स्थगित करावी, तसेच संबंधित कंपन्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
महिलांना मानसिक त्रास देऊ नये, अन्यथा संबंधित कर्जवसुली कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. महिलांना त्रास देण्याचा प्रकार सुरू राहिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जन आंदोलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, पीककर्ज पुनर्गठनाचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिला बचत गट व मायक्रो फायनान्स कर्जदार महिलांनाही दिलासा मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.



