तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत!
हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या रविकांत तुपकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून, या मदतीतून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने ठोस भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. देऊळगाव राजा तहसील कार्यालय तहसीलदारांना निवेदन दिले त्यावेळी केली.
रविकांत तुपकर यांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून दुष्काळग्रस्त शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. या निवेदनात १५ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
पाच हजार रुपये नव्हे, हेक्टरी एक लाख रुपये द्या!
दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीचा उत्पादन खर्च, कर्जाचे हप्ते, व्याज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ५ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. शासनाने हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.
कर्जमाफी, पीकविमा आणि शेतमजुरांना आर्थिक आधार
शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि नवीन पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सन २०२४ व २०२५ मधील प्रलंबित पीकविमा पात्र शेतकऱ्यांना अदा करावा आणि २०२६ चा पीकविमा मंजूर करून वितरित करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
दुष्काळामुळे रोजगार गमावलेल्या भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना एक लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जनावरांचा चारा-पाणी आणि शेतीच्या विजेचा प्रश्न सोडवा
दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पुरेसा चारा, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, शेतीसाठी अखंडित वीज द्यावी आणि जळालेले अथवा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्यावेत, अशा मागण्या तुपकर यांनी केल्या आहेत.
शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करा
बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून कर्जवसुलीसाठी शेतकरी व महिला बचत गटांना धमकावणे, मानसिक त्रास देणे किंवा सार्वजनिक अपमान करणे असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आर्थिक संकटातील कर्जदारांना कर्जपुनर्गठन आणि सुलभ हप्त्यांची सुविधा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत द्यावी!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ तुटपुंज्या मदतीच्या घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष नुकसानाच्या तुलनेत भरीव आर्थिक मदत हवी आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सदर आंदोलनात मधुकर शिंगणे,शेख जुल्फेकार, प्रदीप हिवाळे, सहदेव लाड, वसंतराव पाटील, पुरुषोत्तम शिंगणे, देविदास शिंगणे, संजय शिंगणे, बालाजी सोसे, गजानन जायभाये,, मामाजी , किसन मामा, राजेंद्र शिंगणे, पिंटू डोके, सहदेव लाड, जिलानी भाई, राजु नागरे, गणपत शेळके, संदीप शिंदे या प्रमुख शेतकऱ्यासह अदी शेतकरी उपस्थित होते.



