“गोंडपिपरी कर्तृत्व सन्मान-२०२६” कार्यक्रमातून कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव
चेतनसिंह गौर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गोंडपिपरी येथे ‘गोंडपिपरी कर्तृत्व सन्मान-२०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप शहराध्यक्ष चेतनसिंह गौर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू नागरिकांना मोतीबिंदूची तपासणी तसेच आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता हे आयोजन खैरे कुणबी समाज सभागृह, व्यंकटपूर रोड, गोंडपिपरी येथे होणार आहे. गोंडपिपरी तालुक्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून समाजासाठी योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींची या वेळी निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरााव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भाजपाध्यक्ष हरीश शर्मा, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य मार्गदर्शक अर्चना भोंगळे, प्रदेश महामंत्री अलका आत्राम, भाजप जिल्हा महामंत्री विवेक बोढे, चंद्रपूर जिल्हा महामंत्री निलम सुरमवार, तालुका अध्यक्ष दीपक सातपुते, नगराध्यक्ष अश्विनी तोडासे आणि माजी सदस्य अमर बोडलावार यांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
‘समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, हाच वाढदिवसाचा खरा उत्सव’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाचे साक्षीदार व्हावे, तसेच मोतीबिंदू शिबिराचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक चेतन गौर, मित्रपरिवार गोंडपिपरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



