ग्रामसभेवर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा बहिष्कार; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
ग्रामसभा बैठकींच्या तरतुदींमध्ये सुधारणा व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकार्यानी ग्रामसभा बैठकीसंदर्भातील विद्यमान तरतुदींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करत, शासनाकडून याबाबत योग्य निर्णय होईपर्यंत ग्रामसभा बैठकीत सचिव म्हणून कामकाज न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात ग्रामसभा बैठकींचे आयोजन, नियोजन व बैठकींच्या संख्येबाबत आवश्यक प्रशासकीय सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
ग्रामसभा बैठकीदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी अनेकदा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत असून, त्यातून मानसिक तसेच प्रशासकीय ताण वाढत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
जळगाव जिल्ह्यात १७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसेवकाचा झालेला मृत्यू ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामसभा बैठकीतील तरतुदी, बैठकींचे नियोजन व कामकाजाच्या पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा होईपर्यंत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभा बैठकीत सचिव म्हणून कामकाज पाहणार नसल्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
हा निर्णय शासनाच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने नसून, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या जीवन आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. कामाचा वाढता ताण तसेच ग्रामसभा बैठकीदरम्यान निर्माण होणारे अनुचित प्रकार लक्षात घेऊन शासनाने तातडीने आवश्यक सुधारणा करून स्पष्ट शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत शासनाकडून आवश्यक सुधारणा व यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभा बैठकीत सचिव म्हणून कामकाज करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खोब्रागडे, सचिव प्रभुदास राऊत, तसेच कृपानंद बगडे, भुजंग सूर्यवंशी, संतोष घाटे, वामन चौधरी, प्रभाकर परकीवार, ममता बक्षी, पारखी आदी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



